अळू वडी : महाराष्ट्रात खास करून कोकणात बनविला जाणारा पारंपरिक खमंग, रुचकर पदार्थ जो प्रत्येक मेनू मध्ये आवर्जून असतोच. महाराष्ट्र प्रमाणे गुजरात मध्ये हा पदार्थ पात्रा या नावाने फेमस आहे. अशी ही रुचकर खमंग वडी आता आपण बनवूया.
अळू वडी
वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
- १० काळ्या देठाची मध्यम आकाराची पाने
- २ कप बेसन
- २ चमचे तांदळाचे पीठ
- १ चमचा आलं लसूण मिरची पेस्ट
- १ चमचा गरम मसाला
- २ चमचे लाल मिरची पावडर
- १/४ छोटा चमचा हळद
- २ छोटे चमचे चिंच पेस्ट
- १ चमचा गूळ
- २ चमचे तीळ
- २ चमचे भाजलेली खसखस
- हिंग
- कोंथिबीर
- स्वादा नुसार मीठ
वडी बनवण्याची कृती :
स्टेप १:
- सर्व प्रथम अळूची पाने धुऊन स्वच्छ पुसून घ्या.
- नंतर पानाच्या देठ काढून घ्या व पानांच्या मागील बाजूकडील शिरा सुरीने कापून टाका किंवा पानांच्या मागील बाजूवर लाटणे फिरवा जेणे करून शिरा दबल्या जातील.
स्टेप २:
- एका भांडयात बेसन, तांदळाचे पीठ, आल लसूण मिरची पेस्ट, मिरची पावडर,हळद,गरम मसाला, चिंच पेस्ट,गूळ, तीळ, भाजलेली खसखस, हिंग,कोंथिबीर,मीठ घालून त्यात आवश्यकते नुसार थोडे थोडे पाणी घालून साधारण घट्ट पीठ भिजून घ्यावे.
स्टेप ३:
- अळूचे सर्वात मोठे पानं घेऊन उलटे (पालथे) ठेऊन, त्यावर आपण बनवलेले मिश्रण पातळसर पूर्ण पानभर पसरवून लावावी.
- नंतर दुसरं पान घेऊन ते अपोजिट डिरेकशन मध्ये उलटे ठेवा (म्हणजे खालच्या पानाच्या देठा कडील बाजूवर वरच्या पानाची शेंड्या कडील टोक येईल असे ठेवा).
- त्यानंतर दुसऱ्या पानावर वरील प्रकारे मिश्रण लावून घ्या. अश्याच प्रकारे एकावर एक उलट सुलट तीन ते चार पाने ठेऊन घ्या.
- नंतर पानाच्या दोन्ही बाजू कडील कडा दुमडून, पानाच्या वरच्या बाजूने गुंडाळी/ रोल करण्यास सुरुवात करावी, एक गुंडाळी झाली कि त्यावर थोडे पीठ लावावे, परत दुसऱ्या गुंडाळी झाली कि परत पीठ लावा , अश्या प्रकारे रोल करून घ्या.
- नंतर रोल सुटू नये म्हणून वाटल्यास रोलला वरून धागा गुंडाळून ही घेऊ शकतो .
- थाळीला तेलाने ग्रीसिंग करून त्यावर रोल ठेवा आणि स्टीमर मध्ये ठेऊन वीस ते पंचवीस मिनिटे वाफवून घ्या.
- थंड झाल्यावर एक सेंटीमीटर आकाराच्या वड्या कापून घ्या.
- पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी,जिरं,तीळ टाकून तडतडल्यावर त्यात वडया शॅलो फ्राय करून घ्या किंवा डिप फ्राय ही करू शकता.
- अळूवडी कोंथिबीर आणि ओल खोबरं टाकून सर्व्ह करा .
टीप :
- अळू वडीचे रोल करून वाफवून आपण फ्रिज मध्ये ठेऊ शकतो. आपल्याला पाहिजे तेव्हा काढून शॅलो फ्राय करू शकतो.
- बेसना ऐवजी चणाडाळ भिजवून,नंतर वाटून ही वडी केली जाते .
0 टिप्पण्या