पारंपारिक दही सांडगी मिरची : वाळवलेल्या सांडगी मिरच्या (Stuffed Dried chilli) हा जेवणा बरोबर तोंडी लावण्याचा चांगला पर्याय आहे. रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन बऱ्याचदा काही तरी वेगळ खावस वाटण साहजिकच आहे. मग अश्यावेळी आपण वेगवेगळी लोणची,चटण्या,पापड,कुरडयाचा जेवणात अंतर्भाव करतो किंवा कधी तरी काही साधस खावस  वाटत त्यावेळी सांडगी मिरची हा एक वेगळा व उत्तम पर्याय होऊ शकतो.

पावसाळ्या येण्याआधी उन्हाळयाच्या दिवसात आपण बरेच वाळवणाचे पदार्थ करून कडक उन्ह्यात सुकवून ठेवतो जेणेकरून ते टिकतील व त्याचा आस्वाद आपण संपूर्ण वर्षभर घेऊ शकतो. भारतातील प्रत्येक प्रांतात वेगवेगळे वाळवणाचे पदार्थ केले जातात. महाराष्टात कोकण प्रांतात वाळवणीची सांडगी मिरची करण्याची पद्धत आहे. हि मिरची चवीला खूप रुचकर व तोंडाची चव वाढवणारी असते. त्यामुळे साहजिकच जेवण अधिक चवीने खाल्ले जाते.   

सांडगी मिरची थोडया जाडसर आणि बुटक्या मिरच्या किंवा भावनगरी मिरची वापरून केल्या जातात परंतु जर त्या मिरच्या नाही मिळाल्या तरी साध्या कमी तिखट हिरव्या मिरच्या वापरल्या तरी चालतात. जेवणाची चव वाढवायला बरोबर एखादी तळलेली सांडगी मिरची असली की बस. 

Dahi sandgi mirchi recipe


पारंपारिक दही सांडगी मिरची


सांडगी मिरचीचे साहित्य :Ingredient of dried Masala chilli 

  • हिरव्या मिरच्या 
  • ६ मोठे चमचे धणे 
  • २ छोटे चमचे मेथी दाणे 
  • २ छोटा चमचा हळद 
  • २ छोटा चमचा हिंग 
  • १ चमचा हळद 
  • ४ चमचे मोहरी 
  • ४ चमचे तीळ 
  • मीठ चवीनुसार 
  • १/२ वाटी आंबट दही 

मिरच्या बनविण्याची कृती :

स्टेप १:

  • सर्वप्रथम धणे घेऊन मिक्सर जार मध्ये घालून जाडसर पावडर करून घ्या. 
  • नंतर अश्याच प्रकारे मेथी,मोहरी एक-एक करून वेगवेगळे मिक्सर मधुन जरा जाडसर पावडर करून घ्या. मिक्सर जार मधून कधी-कधी जास्त बारीक पावडर होते,म्हणून खलबत्त्यातून कुटून घेतले तरी चालेल. 
  • एका बाउल मध्ये धणे पावडर,मेथी पावडर,मोहरी पावडर,हळद,हिंग चांगले मिक्स करून ठेवावे. 

स्टेप २:

  • मिरच्या चांगल्या धुऊन चांगल्या कपड्याने पुसून घ्याव्यात. 
  • नंतर मिरच्यांना चाकूने देठ न काढता,मधोमध एकाच बाजूने उभी चीर देऊन घ्यावी. 
  • मसाला भरण्यायोग्य अश्याच प्रकारे सगळ्या मिरच्यांना चिरा देवून ठेवाव्यात. 

स्टेप ३:

  • वरील मिश्रणात चवीनुसार मीठ आणि आवश्यकते नुसार दही घालून सर्व साहित्य चांगले कालवून घ्यावे. 
  • हा मसाला चीर दिलेल्या मिरच्यांमध्ये थोडा-थोडा एका-एका मिरचीत दाबून नीट भरून घ्यावा. 
  • मसाला भरून झाल्यावर परातीत किंवा सुपात सुटसुट्या पसरून ठेऊन उन्हात वाळविण्यासाठी ठेवाव्यात. 
  • अश्याच प्रकारे सर्व मिरच्या भरून कडक उन्हात ८-१० दिवस वाळवून घ्याव्यात. 
  • मिरचीचे देठ हाताने खुडकन मोडू लागले की,मिरच्या वाळल्या असे समजावे.
  • मिरच्या सुकल्यानंतर त्याचा रंग बदलतो.  
  • मिरच्या चांगल्या वाळवून कडक झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. 
  • एखादं वेळेला तोंडी लावण्यासाठी काहीही नसल्यास त्यावेळी मिरची डब्यातून काढून तेलात तळून गरम-गरम भात,वरण,साजूक तूप आणि त्याबरोबर कुरकुरीत तळलेली मिरची.  

टीप :Tips 

  1. सांडगी मिरची बनविण्यासाठी जाड व बुटक्या मिरच्या वापरतात. 
  2. मिरचीत मिठाचे प्रमाण थोडे जास्त वापरले जाते. 
  3. ह्या मिरच्या वर्षभर छान टिकतात. 
  4. आपण मिरचीत जीर ही वापरू शकतो. 
  5. मिरचीत ताकात भिजलेला साबुदाणा ही घातला जातो.