कच्च्या फणसाची भाजी:स्वादिष्ट आणि रुचकर कोकणी स्टाइल कोवळया फणसाची भाजी म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच असते. फणस ही उन्हाळ्यात मिळणारे फळ असल्यामुळे आपल्याला फणसाच्या भाजीचा आस्वाद फक्त उन्हाळ्यातच घेता येतो. प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने फणसाची भाजी केली जाते. फणसाची भाजी ही छोट्या आणि कोवळ्या फणसा पासुन बनविली जाते.

कोकणात कच्च्या फणसाची भाजी सर्वत्र केली जाते. सर्वांच्या परसदारात फणसाच्या झाडावर लटकलेल्या फणसाच्या कुयऱ्या उन्हाळ्यात आपल्याला हमखास दिसतात. त्या फणसाच्या कोवळ्या कुयऱ्या तोडून फणसाचाची भाजी केली नाही असा एकही कोकणी माणूस सापडणार नाही. 

ही भाजी साफ करताना थोडा त्रास होतो, परंतु साफ केल्यानंतर केल्या जाणाऱ्या फणसाच्या भाजीची चव  लाजवाब असते. ज्याप्रमाणे प्रत्येक बाराकोसावर पाण्याची चव बदलते तशीच. कोकणातील वेगवेगळ्या भागात फणसाची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. पण तीळकूट आणि ओलखोबर घालून केलेल्या फणसाच्या भाजीची चव एकदम झक्कास असते. 

चपाती किंवा भाकरी बरोबर त्याचा आस्वाद घेणे म्हणजे कोकणी माणसाचा आवडता मेनू. कच्च्या फणसाला अंगची अशी चव नसते परंतु त्यात तिळकूट, ओल खोबरं आणि आलं-लसणीची फोडणी ह्या मुळे भाजी अत्यंत स्वादिस्ट बनते. अश्या ह्या फणसाची भाजी करून त्याचा आस्वाद घेणे म्हणजे एक पर्वणीच असते. 


kacchya fanasachi bhaji recipe
कच्च्या फणसाची भाजी 


              फणसाची भाजी (Raw Jackfruit Sabzi)

फणसाच्या भाजीचे साहित्य :Ingredients of Jackfruit Sabzi

  1. १ मध्यम आकाराचा भाजीचा फणस
  2. १/२ वाटी ओल खोबरे  
  3. १ वाटी ताजे ओले पावटे/शेंगदाणे 
  4. दीड चमचा लाल तिखट 
  5. १ चमचा गोडा मसाला 
  6. १ चमचा धने पावडर 
  7. २ चमचे भाजलेले कारळ्याचे कूट (लांबट तीळ,निगर सीड,राम तीळ )
  8. १/४ चमचा हळद 

फोडणीचे साहित्य :

  1. तेल 
  2. १/४ छोटा चमचा मोहरी 
  3. १/४ छोटा चमचा जीरे 
  4. चिमूटभर हिंग 
  5. २ -३ कडीपत्त्याची पाने 
  6. १ मोठा कांदा 
  7. चवीसाठी मीठ 
  8. १ चमचा आलं-लसूण-मिरची पेस्ट 

फणसाची भाजी बनवण्याची कृती : 

  1. सर्वप्रथम हाताला आणि विळीला/सुरीला तेलाचा हात फिरवून कोवळा फणस (कुयरी) चिरावा. म्हणजे हाताला चीक चिकटणार नाही. 
  2. फणस मधोमध आडवा चिरावा फणसाचा चीक पुसून घ्यावा. नंतर अर्ध्या भागाचे चार तुकडे करावेत. प्रथम फणसाची साल(काट्याचा भाग) काढून टाकावा. मधल्या देठापासून खाली आलेला पांढरट भाग (पाव) काढून टाकावा. 
  3. बाकीच्या मधल्या भागाचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावे.फणसाचे तुकडे लगेच पाण्यात घालावे नाहीतर ते काळे पडतात. अश्याच प्रकारे बाकीच्या अर्ध्या भागाचे तुकडे कापून घ्यावेत. 
  4. एका भांडयात पाणी घेऊन त्यात फणसाचे चिरलेले तुकडे घालून कुकरमध्ये ठेवून तीन शिटया करून फणसाचे तुकडे वाफवून घ्यावेत.(फणसाचे तुकडे खूप जास्त शिजवू नये ) 
  5. ओले पावटे किंवा शेंगदाणे ही कुकरमध्ये ठेवून वाफवून घ्या .
  6. कुकर थंड झाल्यावर फणसाच्या शिजलेल्या फोडी काढून थंड करून,नंतर वरवंटयाने ठेचून किंवा हाताने कुस्करून  घ्या, म्हणजे त्याचा खोबऱ्यासारखे गर मिळेल.
  7. कारळे कोरडेच पॅनमध्ये १ ते २ मिनिटभर परतून घ्या. नंतर मिक्सर मधून जाडसर कूट करून घ्या. 
  8. एका मोठया थाळीत कुस्करून घेतलेला फणसाचा गर घेऊन त्यात शिजलेले पावटे किंवा शेंगदाणे व तिखट,हळद,गरम/गोडामसाला,कारळ्याचे कूट,चवीनुसार मीठ घालून चांगले चोळून एकजीव (मिक्स) करून घ्या,म्हणजे सर्व घटक मस्त मिळून येतील . 
  9. कढईत तेल,मोहरी,जीर,हिंग,कडीपत्त्याची पाने,चिरलेला कांदा चांगला गुलाबीसर परतून घ्या. नंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून परतून घ्या . 
  10. कांदा आणि आलं लसूण पेस्ट चांगली परतल्यावर त्यावर एकजीव करून ठेवलेले मिश्रण घालून चांगले परतून घ्यावे व कढईवर झाकण ठेवावे व झाकणावर पाणी ठेवून मंद आचेवर एक वाफ आणावी. भाजीत पाणी घालू नये. (भाजी जास्त शिजवायची गरज नसते,कारण फणस आणि ओले पावटे वाफवून घेतले आहेत )
  11. भाजी शिजल्यावर त्यावर ओल खोबर व कोथिबीर घालावी . 

टीप :Tips 

  1. फणसाच्या भाजीला फोडणीमध्ये तेल थोडे जास्त लागते. 
  2. ओल खोबर वरून घालण्या ऐवजी आपण खोबर वाटून ही त्यात घालू शकतो . 
  3. भाजीत कोकमाची सोल ही टाकू शकतो . 
  4. भाजीत पाणी बिलकूल घालू नये . 
  5. आवडत असल्यास गूळ किंवा साखर ही घालू शकतो.

🌼फणसाचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून लाभ : Jackfruit Health Benefits 


👉ब्लड सर्कुलेशन सुधारते: फणसा मध्ये भरपूर प्रमाणात फायबर व आयरन असते त्यामुळे ऍनिमिया दूर होऊन ब्लड सर्कुलेशन सुधारते. 

👉हृदया साठी गुणकारी: फणसा मध्ये पोटेंशिअम असते जे आपल्या हृदयाच्या आरोग्याला खूप उपयुक्त ठरत. फणसा मध्ये कॅलरी नसतात त्यामुळे हृदय रोग्यांना फणस उपयुक्त मानला जातो. 

👉हाडे मजबूत होतात: फणसा मध्ये मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांना बळकटी प्राप्त होऊन ऑस्टियोपोरायसिस मध्ये फायदा होतो. 

👉बद्धकोष्ठता: फणसा मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे बद्धकोष्ठता व पचना संबधी समस्या दूर होण्यास उपयुक्त आहे.  

👉त्वचेसाठी गुणकारी: फणसामध्ये अँटिऑक्सिडंट घटक असल्यामुळे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, त्वचेचे एकूणच आरोग्य सुधारते.    

👉रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: शरीराला रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी तसेच कॉमन सर्व साधारण आजाराशी लढण्यासाठी अँटिऑक्सिडेन्टची गरज असते. फणसामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेन्ट व  व्हिटॅमिन-सी असतात.  


🌼 अन्य रेसिपीस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा .